वळती: वळती ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त केला जात आहे. मेरी पंचायत या अँप वर मिळालेल्या माहितीच्या आधारे, ज्या कामांसाठी १०-१५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, त्याच कामांसाठी लाखोंच्या बिलांची उचल करण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, काही कामे प्रत्यक्षात झाल्याचेही कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत, त्याची व्यवस्थित माहिती देखील उपलब्ध नाही, तरीसुद्धा त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे.
या संपूर्ण प्रकाराची सत्यता जाणून घेण्यासाठी श्री. राजू धनवे यांनी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत ग्रामपंचायतीकडे गावातील काही कामांशी निगडित माहिती मागितली होती. मात्र, ग्रामपंचायतीकडून ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. ही टाळाटाळ अधिक संशयास्पद वाटत असून, यात काहीतरी घोळ असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच गावामध्ये झालेल्या विकास कामांमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. जसे कि- वार्ड क्रमांक १ मध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थेबद्दल करण्यात आलेल्या शोषखड्ड्यांबद्दलच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून ग्रामपंचायतीची भूमिका संशयास्पद वाटत आहे. जलजीवन मिशन २ अंतर्गत गावात झालेल्या नळयोजनेची कामे संशयास्पद किंवा अपूर्ण झाल्याचे दिसत आहे. गावाच्या पश्चिमेकडील वनीकरणात होत असलेल्या सोलर कामात देखील घोळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा अनेक कामात ग्रामपंचायतीची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जाते.
ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत पारदर्शकता ठेवली गेली पाहिजे, यासाठी गावकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाच्या विविध योजनांच्या निधीतून ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात पैसा येत असतो, मात्र तो योग्य कामांसाठी वापरला जातो की नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीच्या या संशयास्पद बिलांबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जर यात काही अपहार झाला असेल, तर दोषींवर योग्य ती कारवाई होण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत श्री राजू धनवे हे माहिती मागवत आहेत. परंतु ग्रामपंचायतीकडून माहिती देण्यात दिरंगाई केली जात आहे.
लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मिळून अशा प्रकारच्या संभाव्य भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. वळती ग्रामपंचायतीत घोळ झाला आहे का? हे अद्याप सिद्ध झाले नसले, तरी ग्रामपंचायतीने माहिती न देण्याचा प्रकार हा संशयास्पद ठरत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.
तसेच, वळती ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या योजनांची, विकासकामांची माहिती सर्व गावकऱ्यांना मिळावी या हेतूने rajdhanve.in या आमच्या वेबसाईट वर आम्ही “असे आमचे वळती गाव” ही लेखमालिका चालू करत आहोत.
ज्यामध्ये गावातील योजनांची, विकासकामांची, लोकांच्या अधिकारांची माहिती देणार आहोत, तसेच सिमेंट रोडखाली दबलेल्या खड्ड्यांपासून तर माळावर मुरूम काढून पडलेल्या खड्ड्यांपर्यंत, चहापानाच्या खर्चापासून तर पाण्याच्या योजनेपर्यंत सर्व कामाची संदर्भासहित, कागदपत्रासहित माहिती देणार आहोत.
तसेच भ्रष्टाचार मुक्त गाव करण्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग कसा करता येतो. त्यातून कोणती माहिती गावकरी मागवू शकतात, माहिती कशी, कोणाकडे मागायची या सर्व गोष्टींबद्दल माहिती मिळणार आहे.
यासाठी ग्रामपंचायत कडून माहिती मागवली जात आहे. जशी जशी माहिती ग्रामपंचायत कडून पुरवली जाईल. तशी ती rajdhanve.in वर प्रकाशित केली जाईल.
याबद्दल सविस्तर माहिती आपण “असे आमचे वळती गाव” या लेखमालिकेत पाहणार आहोत. त्यासाठी आमच्या व्हाट्स अँप चॅनेल ला Follow करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला नियमित अपडेट्स मिळत राहतील.
धन्यवाद!
4 thoughts on “वळती ग्रामपंचायतीत आर्थिक गोंधळ? हजारांचे काम, लाखोंची बिले! अन माहिती देण्यास टाळाटाळ…”